मुलांमध्ये कला, इतिहास व संस्कृतीबद्दल आवड निर्माण करण्याचे 4 सोपे उपाय
लहानपणी आपल्यापैकी बऱ्याच जणांना इतिहास हा एक कंटाळवाणा विषय वाटायचा. परीक्षेच्या भीतीने आपण राजांची नावे व त्याचबरोबर युद्ध झालेली वर्षे यांची यादी पाठ तर करायचो परंतु परीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी आपण ते विसरूनही जायचो. हे असे असले तरी आपल्याला ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायला आणि मोठ-मोठे राजवाडे बघायला खूप आवडते. मुगल-ए-आजम सारखा इतिहासावर आधारित सिनेमा जेव्हा टी.व्ही. वर लागतो तेव्हा आपण तोच आवर्जून पाहतो. तरी सुद्धा आपल्या समाजात इतिहास, संस्कृती आणि कलेच्या अभ्यासाविषयी निराशावादी विचार का आहेत?
त्याचे कारण हे आहे की बहुतेक लोक इतिहासाचा अभ्यास फक्त पाठ्यपुस्तकातूनच करतात. पाठ्यपुस्तके आपल्याला इतिहासाची केवळ प्राथमिक माहिती देण्याचेच काम करतात. परंतु इतिहास हा काही फक्त राजांच्या नावांची मोठी यादी नव्हे, तर तो देश आणि समाजाच्या विकासाची कहाणी आहे. मुलांमध्ये ही समज निर्माण करण्यात शिक्षक व पालक यांची भूमिका खूप मोठी आहे. परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्याच्या शर्यतीत ही समज कुठे तरी मागे पडत जाते. आज समाजात विविध देश व संस्कृतीचे लोक एकत्र काम करत आहेत. तेव्हा ही समज आपल्याला आपल्यापेक्षा वेगळे असणाऱ्या लोकांप्रती सहिष्णू बनवते.
म्हणूनच या लेखामध्ये आम्ही तुम्हाला 4 सोपे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही मुलांमध्ये इतिहास, संस्कृती आणि कलेविषयी आवड निर्माण करू शकाल.
1. मुलांना ऐतिहासिक सिनेमा किंवा चलचित्र (डॉक्युमेंटरी) दाखवा:
बऱ्याच मुलांना इतिहास हा कंटाळवाणा विषय वाटतो. या विषयाची मुलांमध्ये आवड निर्माण करणे हे शिक्षक व पालक यांच्यासाठी आव्हान आहे. पुस्तकांमधील इतिहासातील मोठ-मोठ्या घटना या फक्त तारीख म्हणून राहून जातात. परंतु मुलांना त्या घटनेमागील सामाजिक व राजकीय कारण नीटसे समजत नाही. ऐतिहासिक घटनेवर बनविलेला सिनेमा अशा पैलूंवर प्रकाश टाकण्यात मदत करू शकतो. असा सिनेमा अथवा डॉक्युमेंटरी पाहून झाल्यावर मुलांशी त्या घटनेबद्दल चर्चा करा आणि त्या घटना त्यांच्या पुस्तकाशी जोडण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे ऐतिहासिक घटना त्यांना व्यवस्थित समजतील व त्यांच्या लक्षात पण राहतील.
2. मुलांना विदेशी भाषा शिकायला प्रोत्सहन द्या:
कोणत्याही देशाची भाषा ही त्या समाजाचे प्रतिबिंब असते. ज्या देशाची भाषा आपण शिकतो त्या देशाची संस्कृती आपण चांगल्या प्रकारे समजू शकतो. जी मुले बहुभाषी असतात त्यांना विविध प्रकारच्या संस्कृतींची जाण चांगली असते. बहुभाषी झाल्याने मुलांना आपल्या आजूबाजूच्या जगाची अधिक चांगल्या पद्धतीने माहिती होते. उदाहरणार्थ बऱ्याच लोकांना पूर्व आशियाई देशांबद्दल खूप कमी माहिती असते. त्यामुळे त्यांची या देशांविषयी रूढीवादी विचारधारा निर्माण होते. पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा फक्त लढाई झालेल्या तारखांवर जास्त भर दिला जातो. या देशांची भाषा शिकल्याने मुले तेथील संस्कृती जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतील जसे की टी-सेरेमनी, एकमेकांना वाकून अभिवादन करणे (बो करणे), इत्यादी.
3. विविध प्रकारच्या सांस्कृतिक चित्रांशी मुलांचा परिचय करून द्या:
बहुतांश इतिहासाची पुस्तके कालानुरूप कलेमध्ये होणाऱ्या बदलांच्या स्वरूपांवर फारसा प्रकाश टाकत नाहीत. पाठ्यपुस्तकांमध्ये मर्यादित चित्रे नक्की असतात परंतु ते बघून मुले पूर्णपणे त्या कलाकृतीला समजू शकत नाहीत. त्यासाठी तुम्हाला महागड्या एनसायक्लोपेडिया विकत घेण्याची आवश्यकता नाही. इंटरनेटवर अगदी सहजपणे इतिहासाशी संबंधित खूप रंगीत चित्रे तुम्हाला सापडतील. उदाहरणार्थ गूगलवर ‘वारली आर्ट’ असे शोधा आणि त्यातील जे चित्र मुलांना आवडेल ते त्यांना स्वतः बनवायला सांगा. अशा पद्धतीने अभ्यास केल्याने कलेच्या विविध स्वरूपांबद्दल मुलांमध्ये आवड निर्माण होईल.
4. मुलांना संग्रहालयात फिरायला घेऊन जा:
(Image: By unknown Indus Valley Civilization sealmaker from Mohenjodaro archaeological site. Public Domain, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=9325528)
इतिहासाच्या पुस्तकात वाचलेल्या बऱ्याचशा गोष्टी आपण विसरून जातो. परंतु पुस्तकात असलेली काही चित्रे आपल्याला कायम लक्षात राहतात. आपल्या शहरामध्ये विविध संग्रहालयात अशी चित्रे व कलाकृती असतात. या महामारीच्या काळात आपण मुलांना या संग्रहालयांची वर्चुअल टूर घडवू शकता. त्यामुळे मुले भिन्न-भिन्न कालखंडातील संस्कृतीशी जोडले जातील.
उदाहरणार्थ जेव्हा तुमचे अपत्य प्राचीन भारतीय इतिहासाचा पहिला धडा शिकत असेल तेव्हा त्याला भारतीय राष्ट्रीय संग्रहालयाची वेबसाईट नक्की दाखवा. संग्रहालयातील चित्रे व कलाकृतींबद्दल त्यांच्याशी चर्चा करा. यामुळे इतिहास, संस्कृती व कलेबद्दल मुलांमध्ये उत्सुकता वाढेल आणि ते त्यांच्या पुस्तकातील ज्ञान जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकतील.
कला, इतिहास आणि संस्कृतीची समज असणे आजच्या जगात आवश्यक आहे. येणाऱ्या काही वर्षात आजपेक्षा आणखी जास्त विविध संस्कृती, प्रांत आणि देशांचे लोक एकत्र काम करतील. लहानपणापासूनच विविध संस्कृती आणि भाषांची माहिती असणे भविष्यात मुलांसाठी लाभदायी ठरेल. आम्ही आशा करतो की हा लेख वाचून आपण आपल्या मुलांमध्ये इतिहास, संस्कृती आणि कलेविषयी संवेदनशीलता जरूर निर्माण कराल.
LEAD मध्ये मुलांना चार भिंतीच्या बाहेरचा विचार करायला शिकवतात. कौशल्यपूर्ण शिक्षक व लेटेस्ट टेकनॉलॉजी यांमुळे मुलांचा संपूर्ण विकास अगदी सहज करायला आम्ही नेहमी तत्पर असतो.
LEAD Summer Camp, LEAD Premier League आणि LEAD Master Class याचा मुलांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी उपयोग होईल हाच आमचा प्रयत्न असतो.
LEAD संचालित शाळेमध्ये आपल्या मुलांचे नाव नोंदवण्याकरिता: आजच हा फॉर्म भरा