मुलांना नवीन भाषा शिकवण्यासाठीचे 5 सोपे उपाय
भारतासारख्या बहुभाषिक देशात व्दिभाषिक असणे स्वाभाविक आहे. पाश्चात्य देशांच्या तुलनेत बहुतेक भारतीय मुलांना दोन भाषा शिकाव्याच लागतात: आपली मातृभाषा आणि इंग्रजी. असे असूनही अनेक पालक आपल्या मुलांना जास्त भाषा शिकविण्यास घाबरतात. त्यांना वाटते की जास्त भाषा शिकल्याने मुले गोंधळून जातील आणि याच कारणास्तव ते आपल्या मुलांना जास्त भाषा शिकण्यासाठी उद्युक्त करीत नाहीत. अशी अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात की काही राज्यांमध्ये मुलांना आपली मातृभाषा, त्या राज्याची स्थानिक भाषा आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषा शिकाव्या लागतात. अशा उदाहरणांमध्ये मुलांना आपल्या मातृभाषेत अथवा स्थानिक भाषेत लिहिता-वाचता सुद्धा येत नाही, असे निदर्शनास येते. ही स्थिती सामान्यतः अशा मुलांमध्ये दिसून येते की ज्यांच्या पालकांना केवळ इंग्रजी भाषेचे कौशल्यच महत्वपूर्ण वाटते. या पालकांना असे वाटते की स्थानिक भाषेत संभाषण केल्याने किंवा शिकल्याने आपली मुले इंग्रजी व्यवस्थित शिकू शकणार नाहीत.
हा जो सर्वसाधारण गैरसमज आहे याच्या उलट बहुभाषिक असण्याचे अनेक फायदे आहेत. उदाहरणार्थ याने मुलांची विषयांचे आकलन करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते, सांस्कृतिक चेतना वाढते आणि भविष्यात अधिक चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता देखील वाढते.
या लेखात आम्ही तुम्हाला मुलांना एक नवीन भाषा शिकवण्यासाठीचे पाच सोपे उपाय सांगणार आहोत.
कोणतीही नवीन भाषा शिकवण्याकरिता लहानपणापासूनच प्रारंभ करावा:
आपण एखादी नवीन भाषा कोणत्याही वयात शिकू शकतो, परंतु लहान मुलांच्या बाबतीत ही शिकण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करता येऊ शकते. 2 ते 3 वर्षे वयोगटातील मुले आवाजाचे नवीन-नवीन पॅटर्न समजून घेण्यात सर्वात अधिक ग्रहणशील असतात व त्यामुळे नवीन भाषा ते अगदी सहजपणे शिकू शकतात. जर आपले कुटुंब बहुभाषिक असेल अथवा आपण अशा राज्यात स्थायिक असाल, ज्या ठिकाणची स्थानिक भाषा तुमच्या मातृभाषेपेक्षा निराळी आहे तर आपल्या मुलांना नवीन भाषा शिकवण्याकरिता 2 ते 3 वर्षांचे वयोगट अत्यंत योग्य आहे. आपण असा विचार करू नका की मुले यामुळे गोंधळून जातील. या वयात मुले दोन वेगवेगळ्या भाषांमधले अंतर सहज समजू शकतात.
प्रति-व्यक्ती-एक-भाषा मॉडेलचा उपयोग करा:
जर तुमची व तुमच्या जोडीदाराची मातृभाषा वेगळी असेल तर तुम्ही प्रति-व्यक्ती-एक-भाषा मॉडेलचा उपयोग करू शकता. उदाहरणार्थ तुमची मातृभाषा हिंदी आणि तुमच्या जोडीदाराची मातृभाषा गुजराती असेल, तर तुम्ही तुमच्या मुलाशी फक्त हिंदीमध्ये बोला व तुमच्या जोडीदाराला मुलाशी फक्त गुजरातीमध्ये बोलायला सांगा. अशीही शक्यता असेल की तुमचे मूल शाळेमध्ये इंग्रजीसारखी एक तिसरी भाषा शिकत असेल. जर तुम्ही व तुमचा जोडीदार इंग्रजी बोलण्यात प्रवीण असाल तर तुम्ही शालेय गृहपाठ करवून घेताना मुलांशी इंग्रजीमध्ये बोला.
इंटरनेटवर भाषा शिकण्याचे निःशुल्क कोर्सेस शोधा:
काही वर्षांपूर्वी एखादी विदेशी भाषा सहज शिकणे सामान्य लोकांसाठी आवाक्याबाहेरचे होते. परंतु आजच्या जमान्यात इंटरनेटवर भाषा शिकण्याविषयीचे अनेक कोर्सेस निःशुल्क उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ Learn French with Alexa, हे एक निःशुल्क युट्युब चॅनेल आहे ज्याद्वारे आपण फ्रेंच भाषा शिकू शकता. तुम्ही मोबाईलवर Duolingo सारखे अॅप सुद्धा डाउनलोड करू शकता की जेणेकरून भाषा शिकणे अतिशय सोपे आणि मनोरंजक होऊ शकते. जर तुमच्या मुलाच्या शाळेत एखादी भाषा शिकण्याची व्यवस्था उपलब्ध असेल तर त्या सुविधेचा निश्चित उपयोग करा. परकीय भाषा शिकणे केवळ नवीन संस्कृतीचे आकलन वाढवीत नाही तर भविष्यात मुलांच्या करिअरमध्येसुद्धा या कौशल्याची मदत होऊ शकते. हे कौशल्य विशेष करून अशावेळी उपयोगी पडते जेव्हा तुमचे मूल भविष्यात एखाद्या अशा देशात आपले शिक्षण घेऊ इच्छिते जिथे इंग्रजी भाषा प्रामुख्याने वापरली जात नाही. परकीय भाषांचे थोडेसे आकलनसुद्धा तुमच्या मुलांना आजच्या वैश्विक समाजामध्ये मोठी प्रगती करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
भाषा शिकण्याच्या प्रक्रियेला मजेशीर बनवा:
भाषेचे शिक्षण केवळ लेख, कविता आणि व्याकरणाच्या पुस्तकांपर्यंतच मर्यादित नसते. कोणत्याही भाषेतील चित्रपट अथवा गाणी भाषा शिकण्याच्या प्रक्रियेला मजेशीर बनवतात. उदाहरणार्थ जर तुम्ही तुमच्या मुलाला इंग्रजी शिकवू इच्छित असाल तर त्याला हिंदीमध्ये डब केलेले कार्टून न दाखवता, ते इंग्रजीत दाखवा. जर मुलांना सुरुवातीला अडचण वाटली तर इंग्रजी उपशीर्षक असलेले कार्टून दाखवा. हळूहळू तुमच्या लक्षात येईल की मुले योग्य शब्द निवडू लागतील. कार्यक्रम संपल्यानंतर मुलांबरोबर त्यातील कथेविषयी अथवा पात्रांविषयी चर्चा करा. उदाहरणार्थ तुम्ही मुलांना त्या कार्यक्रमातून नव्याने शिकलेले 2 ते 3 शब्द किंवा वाक्यप्रयोग वहीमध्ये लिहायला सांगा. असे छोटे-छोटे उद्द्येश्यपूर्ण हस्तक्षेप करून तुम्ही तुमच्या मुलांना एक नवीन भाषा शिकण्यासाठी सक्षम बनवू शकता.
योग्य अपेक्षा ठेवा:
भाषा शिकणे हा एक मोठा प्रवास असतो. जेव्हा तुमची मुले अनेक भाषांच्या संपर्कात येतील तेव्हा त्यांनी सर्व भाषा अस्खलितपणे बोलाव्यात अशी अपेक्षा ठेऊ नका. कधी कधी शब्दांचे लिंग वापरण्याबाबत त्यांचा गोंधळ होऊ शकतो किंवा बोलताना ते दुसऱ्या भाषेतील एखाद्या शब्दाचा वापर करू शकतात. अशावेळी त्यांना चुकांची जाणीव करून द्या व त्या सुधारण्यात त्यांची मदत करा. या चुका एका सकारात्मक दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी त्यांची मदत करा आणि त्यांना निरंतर शिकत राहण्यासाठी प्रोत्साहित करा.
बहुभाषिक असण्याचे स्वभावतः अनेक फायदे आहेत. हे कौशल्य तुमच्या मुलांना जगाविषयी अधिक जाणून घेण्याची संधी प्राप्त करून देण्यासारखे आहे. त्यासाठी साधनांची उपलब्धी करून देताना, त्यांच्या भाषा शिकण्याच्या प्रवासाकरिता पूरक व उत्साहवर्धक वातावरण देखील निर्माण करा. भाषा शिकण्याची आवड असणारे समुदाय शोधा अथवा स्वतःच समान आवड असणाऱ्या मुलांचा समूह बनवा. लक्षात ठेवा कि हा प्रवास नेहमी सोपा असेलच असे नाही आणि भाषेमध्ये प्राविण्य हे एका दिवसात मिळवता येत नाही. आम्ही आशा करतो कि तुम्ही तुमच्या मुलाला नवीन भाषा शिकण्यासाठी मुलांना योग्य मार्गदर्शनाची आणि निरंतर पाठिंबा नक्की द्याल.
LEAD मध्ये मुलांना चार भिंतीच्या बाहेरचा विचार करायला शिकवतात. कौशल्यपूर्ण शिक्षक व लेटेस्ट टेकनॉलॉजी यांमुळे मुलांचा संपूर्ण विकास अगदी सहज करायला आम्ही नेहमी तत्पर असतो.
LEAD Summer Camp, LEAD Premier League आणि LEAD Master Class याचा मुलांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी उपयोग होईल हाच आमचा प्रयत्न असतो.
LEAD संचालित शाळेमध्ये आपल्या मुलांचे नाव नोंदवण्याकरिता: आजच हा फॉर्म भरा